Home Uncategorized नाट्य शुभांगीने कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

नाट्य शुभांगीने कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

4 second read
0
0
81

जयसिंगपूर : प्रतिनिधी
नाट्य शुभांगीच्या माध्यमातून जयसिंगपूर शहराला कला संस्कृती लाभले आहे. नाट्य शुभांगी ने कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून दर्जेदार कलाकार बनवले आहेत. गेल्या 50 वर्षापासून जयसिंगपूरचा सांस्कृतिक वारसा देशभर नेण्याचे काम नाट्य शुभांगीने केले आहे. भविष्यात नाट्य शुभांगीच्या माध्यमातून अधिकाधिक कलाकार घडवून जयसिंगपूर शहराचे नाव कलाक्षेत्रात अग्रभागी रहावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. नाट्य शुभांगी व जयसिंगपूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्य शुभांगी च्या सुवर्ण महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला, यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.

यड्रावकर पुढे म्हणाले, जयसिंगपूर हे वाढते शहर असून, मोठ्या शहरांप्रमाणेच येथेही नाट्य, संगीत आणि क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या शहरांमध्ये सर्व सुविधा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध असतात, मात्र लहान शहरांमध्ये अशा सुविधा मिळणे आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीतही जयसिंगपूरमध्ये नाट्य शुभांगी या संस्थेने ५० वर्षे सातत्याने हौशी कलाकार घडवण्याचे कार्य केले आहे, हे त्याचे मोठे यश आहे.
या संस्थेच्या प्रयत्नांमुळे ३५०-४०० हौशी कलाकार घडले आहेत, तसेच संगीत अकॅडमीच्या माध्यमातून साडेचार हजारांहून अधिक विद्यार्थी संगीत शिकले आहेत. भविष्यात या क्षेत्रांना अधिक वाव मिळावा यासाठी स्थायी साहित्य संग्रहालय आणि प्रात्यक्षिकांसाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

जयसिंगपूरमध्ये कलाक्षेत्र, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांकडे निधीसाठी मागणी करण्यात आली असून, भविष्यात नाट्यशुभांगी शासनाच्या सहकार्याने अधिक मजबूत होईल. बी. एन. चौगुले सरांनी घालून दिलेल्या परंपरेला पुढे नेण्यासाठी सर्व कलाकारांनी एकत्र येऊन कार्य करावे, अशी भूमिका मांडली गेली. जयसिंगपूर हे कलावंत घडवणारे केंद्र बनावे आणि भविष्यात अधिकाधिक कलाकार घडावेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ती व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. चौगुले सरांसारख्या नाट्यप्रेमींनी अनेक बालकलाकार घडवले, त्यांना नाट्यसंस्कृतीची गोडी लावली आणि समाजात वेगळ्या पद्धतीने त्यांचे योगदान घडवले. शुभांगीसारख्या कलाकाराच्या स्मृतीसाठी त्यांनी सुरू केलेला उपक्रम पन्नास वर्षे अखंड सुरू आहे, हे त्यांचे मोठे कार्य आहे.
आजच्या काळात अभिनयाच्या क्षमतेपेक्षा देखण्या चेहऱ्यांना जास्त महत्त्व दिले जात आहे, मात्र रंगभूमीवर टिकायचे असेल तर अभिनय आवश्यकच आहे. रंगमंचावर कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात एक वेगळे नाते असते, जिथे नाट्याच्या प्रत्येक घटकातून ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा आणि नाटकाच्या अनुभवाने व्यक्तिमत्व विकास आपोआप घडतो, त्यामुळे नाटक शिकणाऱ्या मुलांना वेगळ्या व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणाची गरज लागत नाही. दुर्दैवाने, आजच्या पिढीला रंगमंचाची ओळख कमी होत आहे, त्याऐवजी स्क्रीन मनोरंजनाकडे ओढले जात आहे. त्यामुळेच जयसिंगपूर आणि पंचक्रोशीतील मुलांना नाट्यसंस्कृतीची गोडी लावण्याची गरज आहे. एकदा त्यांना रंगभूमीची चटक लागली की ती संस्कृती ते पुढे घेऊन जातील. पारंपरिक नृत्यकला जपली गेली पाहिजे, अन्यथा त्याचे बाजारीकरण होऊन त्याचा मूलभूत अर्थ नष्ट होऊ शकतो.
जयसिंगपूर शहराने आजवर नाट्यसंस्कृती जपली आहे आणि ती पुढेही जपली जावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. रंगमंचाची पवित्रता अबाधित ठेवून पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागेल, अशी व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रत्येक नाट्यरसिकाने घ्यावी.

प्रास्ताविक शिरीष यादव यांनी केले. उद्घाटनानंतर नाट्य शुभांगी परिवार प्रस्तुत महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात महिलांनी आपल्या कलेच्या माध्यमातून संस्कृतीचे दर्शन घडवले.

यावेळी उद्योगपती ओमप्रकाश मालू, उद्योगपती विनोद घोडावत, प्रख्यातरंगकर्मी संजय हळदीकर, नाट्य शुभांगीचे अध्यक्ष सुभाष टाकळीकर, सतिष मलमे, राजेंद्र झेले, पराग पाटील, राजेंद्र नांद्रेकर, अमरसिंह निकम, संजय कुलकर्णी, रविंद्र ताडे, विलास जाधव, शुभम झेले, प्रेम कोळी, बंडू पाचोरे, मिलिंद गणबावले, भरत खिचडे, दशरथ शेट्ये यांच्यासह पदाधिकारी व रंगकर्मी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहल कुलकर्णी यांनी केले. आभार रमेश यळगुडकर यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…