शिरोळ: प्रतिनिधी

शिवनाकवाडी येथे सुरू असलेल्या यात्रेत विषबाधेची मोठी घटना समोर आली आहे. यात्रेत महाप्रसाद किंवा स्टॉलवरील अन्न सेवन केल्यानंतर तब्बल १४२ नागरिकांना त्रास झाला असून १७ जणांची प्रकृती गंभीर असून १२४ जणांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. गंभीर रुग्णांना इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात तसेच इतर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी सांगितले की, विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. यात्रेत दिल्या गेलेल्या महाप्रसादात किंवा स्टॉलवरील खाद्यपदार्थांमध्ये काही समस्या असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती कळताच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवनाकवाडीला भेट दिली. त्यांनी रुग्णांची विचारपूस केली आणि आरोग्य विभागाला त्वरित आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या.
या घटनेने संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने संपूर्ण परिसरातील अन्नपदार्थ तपासणीसाठी नमुने घेतले असून लवकरच अहवाल हाती येण्याची शक्यता आहे.


