
शिरोळ : प्रतिनिधी
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,शिरोळ यांनी सन २०२३-२०२४ मध्ये ऊस विकास योजनेअंतर्गत केलेल्या विविध कार्यक्रमाबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिनांक 23 रोजी पुरस्काराचे वितरण होणार अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा यांनी दिली.

ऊस विकास योजनेअंतर्गत कारखान्याच्या वतीने बेणे बदलावरती भर देऊन ऊस विकास कार्यासाठी अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. कारखान्याच्या वतीने एक डोळा रोपे लागवडीचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असून शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर दिलेला आहे. एकरी ऊस उत्पादन वाढीकरता शेतकरी मेळावे व प्रशिक्षण यांचे आयोजन नेहमी केले जाते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढ, सेंद्रिय ऊस उत्पादन, शेतकऱ्यांसाठी झेप एकरी 200 मे. टन तसेच नदीबुड क्षेत्रात शुगर बीट,उन्हाळी सोयाबीन, पेरू चिकू लागवड करून पर्याय पीक व्यवस्था जेणेकरून पूर परिस्थितीमध्ये होणारे नुकसान टाळणे असे अनेक शेतकऱ्यांसाठी नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. कारखान्याच्या वतीने स्वतंत्र अशी माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असते तसेच क्षारपोट जमीन सुधारण्याचा दत्त पॅटर्न संपूर्ण देशभर गाजत आहे.
जवळपास दहा हजार एकर क्षेत्र क्षारपडमुक्त झालेले असून शेतकरी त्यामध्ये पीक घेत आहेत. हा पुरस्कार ऊस उत्पादक शेतकरी बंधूनी कारखान्यावर दाखविलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे अशी प्रतिक्रीया गणपतराव पाटील यांनी व्यक्त केली. सदरच्या पुरस्कारामुळे कार्यक्षेत्रातील सभासद बंधू, कामगार बंधू यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारखान्याने आपली पुरस्कार मिळविण्याची परंपरा कायम ठेवली आहे.


