नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांचा क्रीडाईच्या वतीने जाहीर सत्कार.
कोल्हापूर दि.२६ : पार पडलेल्या निवडणुकीत सुमारे २९ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी वाढली आहे. यामध्ये कुठेही कमी न पडता येणाऱ्या काळात शहरासह जिल्ह्याचे प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची लवकरच भेट घेणार असल्याचे प्रतिपादन नूतन आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
क्रीडाईच्या वतीने आमदार पदी निवडून आल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांचा रेसिडेन्सी क्लब येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, कोल्हापूर जिल्ह्याचा झपाट्याने विस्तार होत असून, औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी या क्षेत्रातील सुरु असणारी घोडदौड अशीच सुरु ठेवण्यासाठी सर्वांना विश्वासात घेवून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री व सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोल्हापूरच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. त्यातून सुरु असणारी कामे प्रगतीपथावर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन समोर ठेवले आहे. नगरविकास मंत्री असताना २०१९ ला शिंदे साहेबांनी UDCPR लागू केला यातून बांधकाम व्यावसायिकांसह ग्राहकांनाही मोठा लाभ मिळाला आहे. अशाच पद्धतीचे लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी महायुती सक्षम आहे. आगामी काळात इमारतींच्या उंचीचा विषयही प्राधान्यक्रमावर घेवून सोडविला जाणार आहे. क्रीडाईची प्रमुख मागणी असलेले आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरसाठी रु.५० कोटींचा निधी वर्ग झाला असून, त्याचेही काम लवकरच सुरु होईल. ३२०० कोटींचा पूरनियंत्रणाचा प्रकल्प शासनाने हाती घेतला असून येत्या एप्रिल महिन्यापूर्वीच त्यातून होणाऱ्या कामास सुरवात केली जाणार आहे. पूरबाधित क्षेत्रातील ब्ल्यू लाईन मधील टीडीआरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. राजर्षी शाहू मिल सुधारणा, खंडपीठ, आयटी पार्क, टेक्नॉलॉजी पार्क, फौंड्री हब, रिंग रोड, परीख पूल हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक बाब आहे त्यामुळे सर्वांना विश्वासात घेवून शहराची हद्दवाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. यासह झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयात क्रीडाई पदाधिकारी व सभासदांचा मोलाचा वाटा आहे. याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानले.
यानंतर क्रीडाईच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष कृष्णात खोत, माजी अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, सेक्रेटरी संदीप मिरजकर यांच्यासह क्रीडाईचे पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.