१७ एप्रिल २०२४
पोलिस भरतीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कागदपत्रांची पूर्तता होऊ न शकल्याने नैराश्येतून तरुणाने आत्महत्या केली. रंगराव बाळासाहेब फाटक (वय २८, रा. महाडिकवाडी, पोस्ट कसबा ठाणे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे.

रंगराव हा वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत पोलिस भरतीची तयारी करीत होता. त्याने यापूर्वी सैन्य भरतीसाठीही प्रयत्न केला होता. मात्र, त्यामध्ये यश न आल्याने गेली काही वर्षे तो पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत होता. खुल्या गटासाठी २८ वर्षाची वयोमर्यादा असल्याने त्याच्यासाठी अखेरची संधी होती. सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण आणि कागदपत्रांची पूर्तता वेळेत होऊ शकली नाही. यामुळे तो नैराश्येत होता.
अर्ज भरता न आल्याने रंगराव मंगळवारी घरीच होता. दुपारी दोनच्या सुमारास तो घरातील वरच्या मजल्यावर गेला. बराचवेळ तो न दिसल्याने कुटुंबीयांनी वरच्या खोलीत डोकावले असता त्याने फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला तातडीने सीपीआरमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
फाटक कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. रंगरावचा मोठा भाऊ दुकान चालवतो. तर रंगराव वडिलांना शेतीत मदत करीत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने ॲकॅडमीत सरावही सुरू केला होता. त्याला भरती होण्याचा विश्वास होता. तसेच त्याने तयारीही चांगली केल्याचे त्याचे मित्र सांगत होते. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.


