कुरुंदवाड येथील सुनील चव्हाण हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या राहुल भबीरे,पवन कित्तुरेसह सांगली जिल्ह्यातील सागर पवार गॅंगच्या ९ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मोक्कातर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी प्रस्ताव मंजूर केला आहे. या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कुरुंदवाड येथील सुनील चव्हाण यांचा१६ ऑक्टोबर २०२३ रोजी जुन्या भांडणाचा राग मनात धरून खून करण्यात आला होता.या खुनाच्या तपासामध्ये सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावरील कुख्यात आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सागऱ्या उर्फ सागर अरविंद पवार (रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली), व टोळीतील सदस्य राहुल किरण भंबीरे, पवन नागेश कित्तुरे,( रा. परीट गल्ली, कुरुंदवाड),शहाजान अल्लाबक्ष पठाण (रा. कृष्णानगर,इचलकरंजी, ता. हातकणंगले),अनिकेत दत्तात्रय ढवणे,तुषार तुकाराम भारंबल,रोहन किरण जावीर, रितेश विकास खरात,सोहन माणिक ठोकळे ( रा. जुना वासुंबे रोड, आदर्शनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) व विधी संघर्षित बालक यांचा सहभाग निष्पन्न झाला. सदरटोळी विरुध्द एकुण १५ गंभीर गुन्हे त्यामध्ये खून, खूनाचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्रानिशी गर्दीमारामारी, किरकोळ व गंभीर दुखापत, खंडणी वसुली यांचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सक्रिय असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि समाजकंटकांचा बिमोड करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी कडक प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार सपोनि रविराज फडणीस यांनी इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे,अप्पर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडे-पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली गुन्ह्याचा तपास करुन सांगली जिल्ह्यातील कुप्रसिध्द “साग-या पवार गँग’ या आतरजिल्हा संघटित गुन्हेगारीविरुध्द मोक्काअंतर्गत कारवाईची पुर्वपरवानगी मिळणेसाठी जिल्हा पोलीस प्रमुख पंडित यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी प्रस्तावाची छाननी करुन प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला असता प्रस्तावाला मंजुरी दिली. कुरुंदवाड शहरातील भबीरे आणि कित्तुरे या दोघांचाही मोक्कातर्गत कारवाईत समावेश झाल्याने शिरोळ तालुक्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.