मुंबई :
बृहन्मुंबई कस्टम ब्रोकर्स असोसिएशन (BCBA) ची झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द करावी व BCBA ची कस्टम्स मान्यता रद्द करावी, असा गंभीर आक्षेप मराठी कामगार सेनेने घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया मनमानी व नियमबाह्य पद्धतीने राबवली जात असल्याचा आरोप करत ती तात्काळ स्थगित करून संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, BCBA च्या निवडणुकीत संबंधित सदस्यांना वेळेत निवडणूक नोटीस व ई-मेलद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत किंवा नाहीत, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच उमेदवार आणि कामगारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी विरेन दयाल यांच्या भूमिकेबाबतही निवेदनात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.कामगारांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा तसेच त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर झालेली नियमबाह्य निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, BCBA ची कस्टम्स मान्यता रद्द करावी आणि संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास १५ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई कस्टम्स हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्याचा इशारा मराठी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष जयसिंग पाटील यांनी दिला आहे.



