पन्हाळा प्रतिनिधी – सचिन वरेकर
शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कंपन्यांचे वसुली एजंट महिलांवर मानसिक व शारीरिक दबाव टाकत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून, या सक्तीच्या वसुलीला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेना युवती सेनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख डॉ. सं. सोनालीताई सागर खडके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शाहूवाडी-पन्हाळा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर शिंदे यांना निवेदन दिले आहे.
ग्रामीण भागातील अनेक महिला मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतात. मात्र, आर्थिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे कर्जाचे हप्ते भरणे त्यांना कठीण जात आहे. अशा परिस्थितीत वसुली एजंटांकडून सक्तीने वसुली केली जात असून, महिलांना मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणूक सहन करावी लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कर्जवसुलीच्या वाढत्या दबावामुळे काही ठिकाणी गंभीर घटना घडल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या एजंटांकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीला तातडीने स्थगिती द्यावी. तसेच महिलांना मानसिक त्रास व दबावापासून संरक्षण देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. सोनालीताई खडके यांनी केली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना दिलासा देण्यासाठी प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव, विधानसभा प्रमुख चंद्रकांत यादव, पन्हाळा उपतालुकाप्रमुख केतन मिरजे, आलका रेड्डी आदी उपस्थित होते.



