Home Uncategorized पशुधन आरोग्य व दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी गोकुळ-सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संयुक्त बैठक संपन्न..

पशुधन आरोग्य व दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी गोकुळ-सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संयुक्त बैठक संपन्न..

4 second read
0
0
24

कोल्हापूर, ता. ०६ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) व सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालय, कणेरी यांच्यात पशुधन आरोग्य, शैक्षणिक प्रशिक्षण व तांत्रिक सहकार्याच्या दृष्टीने प्रस्तावित सामंजस्य कराराबाबत आज गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात संयुक्त बैठक संपन्न झाली.

या बैठकीस गोकुळचे प्रशासकीय सदस्य डॉ. चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मुरगेप्पा, प्रा. डॉ. मार्कंडेय आदी उपस्थित होते.

बैठकीत सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गोकुळच्या माध्यमातून गाय-म्हैस व इतर दुधाळ जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, आजारांचे निदान, उपचार पद्धती, लसीकरण, कृत्रिम रेतन, प्रगत प्रजनन तंत्रज्ञान, वैरण विकास, संतुलित पशुखाद्य निर्मिती तसेच दुग्ध व्यवसायातील विविध तांत्रिक बाबींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

गोकुळमार्फत दूध उत्पादक सभासदांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या पशुवैद्यकीय सेवांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाची जोड देऊन त्या अधिक प्रभावी करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. गोकुळच्या दुग्ध व्यवसायातील अनुभवाचा व दूध उत्पादकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा विचार करून सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाने सहकार्याचा प्रस्ताव दिल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या प्रस्तावित सहकार्यामुळे गोकुळच्या विद्यमान पशुवैद्यकीय सेवा व्यवस्थेला अधिक तांत्रिक बळकटी मिळणार असून, दूध उत्पादक सभासदांना पशुधन आरोग्य व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील अनुभव मिळून भविष्यात कुशल पशुवैद्यकीय तज्ज्ञ घडण्यास हातभार लागणार आहे.

यावेळी गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले म्हणाले, “गोकुळच्या दूध उत्पादक सभासदांच्या पशुधनाचे आरोग्य जपणे आणि त्यांना वेळेवर व दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे संघाचे प्राधान्य आहे. शैक्षणिक संस्थांसोबतच्या अशा सहकार्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि व्यावहारिक अनुभवाचा उपयोग पशुवैद्यकीय सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी होईल.”

सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मुरगेप्पा म्हणाले, “विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गोकुळसारख्या अग्रगण्य दुग्ध संस्थेच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना दुग्ध व्यवसाय आणि पशुवैद्यकीय सेवेचे व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत होईल.”

बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारे प्रस्तावित सामंजस्य कराराचा विषय गोकुळ दूध संघाच्या प्रशासकीय मंडळाच्या आगामी बैठकीसमोर विचारार्थ सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर करारासंदर्भातील सर्व कायदेशीर बाबी, संघाच्या पोटनियमातील तरतुदी तसेच आवश्यक प्रक्रिया तपासून प्रशासकीय मंडळाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

बैठकीस गोकुळचे प्रशासकीय सदस्य डॉ. चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मुरगेप्पा, प्रा. डॉ. मार्कंडेय, प्रा. डॉ. राऊतमारे, प्रा. डॉ. योगी, प्रा. डॉ. परिहार, महाव्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ. दयावर्धन कामत, व्यवस्थापक पशुखाद्य डॉ. व्ही. डी. पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, रमेश पाटील, डॉ. एम. पी. पाटील, संग्राम मगदूम, मृण्मयी सातवेकर तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शैक्षणिक संस्थांच्यामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करा; कालकथित सुरेश कडाळे फाउंडेशनची मागणी..

राज्यात अलीकडे घडलेल्याविद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमधील म…