उमद्या नेतृत्वाच्या जाण्याने चळवळीची हानी होते.हे निश्चित आहे. मात्र, दुःखाला कवटाळून बसलोत तर पोकळी अधिकच वाढेल. त्यामुळे प्रा.काँ.सुभाष जाधव यांच्या विचारांची उर्मी घेऊन प्रत्येकाने डाव्या चळवळीसाठी योगदान देणे हीच खरी त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल असे आवाहन काँ. माया पंडित यांनी केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व ऊसतोडणी कामगार संघटनेचे नेते प्रा.काँ. सुभाष जाधव यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, लाल बावटा कार्यालय कामगार भवन सिद्धनेर्ली येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाव्या पक्षातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच इंडिया आघाडीचे नेते मंडळीही उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी म्हणाले,प्रा. जाधव यांच्या अकाली निघून जाण्याने शेतकरी, कष्टकर्याचे हात दुबळे झाले आहेत. एका ध्येयवेड्या नेतृत्वाला मुकलो असल्याची खंत सलत राहणार आहे.
युवक काँग्रेसचे सागर कोंडेकर म्हणाले, प्रा. जाधव हे निष्कलंक चारित्र्य संपन्न नेतृत्व होते. त्यांनी निस्वार्थपणे डावी चळवळ पुढे नेवून फार मोठे योगदान दिले आहे.
सीटूचे जिल्हा सचिव काँ.शिवाजी मगदूम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कॉ भागवत झाडगे,दिनकर आदमापुरे,नेताजी बुवा,बबन बारदेस्कर, काँ.मोहन गिरी,काँ.विक्रम खतकर, प्रकाश कुंभार(आजरा),सचिन घोरपडे,रामचंद्र पाटील(म्हाकवे), ऊसतोडणी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष आनंदा डाफळे(केनवडे), स्वाभिमानी संघटनेचे तानाजी मगदूम, संजय बल्लाळ, सारिका पाटील, विद्या कांबळे, काँ बाळासाहेब कामते, कॉ आनंदा कराडे, काँ प्रियतोष भोसले, कॉ मनिषा पाटील,उमेश मगदूम, संदेश जाधव,काँ.वेदाताई किल्लेदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अनेकांना गहिवरून आले…
खरं तर प्रा.जाधव यांचे जन्मगाव मांगुर( कर्नाटक) आहे. मात्र, त्यांच्या निर्व्याज कार्यपद्धतीमुळे त्यांची कागलसह कोल्हापूर जिल्ह्यातील डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि सामान्य माणसाशी अतुट नाते निर्माण झाले होते. त्यामुळे शोकसभेत बोलताना अनेकांना गहिवरून आले तर अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
यावेळी बाबु मेटकर, शशिकांत पाटील सर, प्रविण जाधव,संदिप सुतार,रमेश निर्मळे,दिनकर जाधव, राजाराम आरडे,दगडू कांबळे,अशोक शिरोळे,यांच्यासह वेगवेगळ्या चळवळीतील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते..



