Home राजकारण हातकणंगले परिसरात घरफोड्यांचे सत्र; पोलिसांची सतर्कता वाढली

हातकणंगले परिसरात घरफोड्यांचे सत्र; पोलिसांची सतर्कता वाढली

3 second read
0
0
511

आळते येथे ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याच्या सूचना

हातकणंगले प्रतिनिधी – सचिन लोंढे
हातकणंगले (ता. हातकणंगले) : तालुक्यातील आळते व आसपासच्या गावांमध्ये दिवसा व रात्रीच्या वेळी वाढत्या घरफोडींच्या घटनांमुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शरद मेमाणे यांनी आळते ग्रामपंचायतीत ग्रामस्थांसमवेत बैठक घेतली.

या बैठकीत ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी सूचना देखील देण्यात आली. बंद घरे, बाहेरगावी गेलेले कुटुंबीय, व संशयित हालचाली याची माहिती पोलीसांना तात्काळ देणे गरजेचे आहे, यावरही भर देण्यात आला.

सुरक्षा उपक्रमांतर्गत दवंडी व घोषणांद्वारे जनजागृती केली जाणार आहे. गावातील दुकानदारांनी त्यांच्या दुकानाबाहेर रस्त्यावर लक्ष ठेवणारा सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, अशा सूचनाही पोलीस निरीक्षक मेमाणे यांनी दिल्या. यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी संशयास्पद हालचाल कॅमेऱ्यात सहज टिपता येईल आणि तपासात मदत होईल.

“गावातील नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. संशयित व्यक्ती, हालचाली किंवा बंद घरांची माहिती वेळेवर दिल्यास गुन्हे रोखणे सोपे जाईल,” असे पोलीस निरीक्षक मेमाणे यांनी स्पष्ट केले.

या उपाययोजनांमुळे आळते व परिसरात घरफोड्यांना आळा बसेल आणि गाव सुरक्षित राहील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *