
शिरोळ : प्रतिनिधी
आईने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा कोणताही विचार न करता आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्यानंतर आपल्या बायकोच्या अचानक निघून जाण्याने टेन्शनमुळे वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.आणि इवलासा केवळ ११ महिन्यांच्या ईशान आई वडिलांच्या प्रेमाला पोरका झाला.त्याला सोडून आई-वडील या जगातून कायमचे निघून गेले.त्यामुळे चिमुकल्या *ईशानचा* सांभाळ कसा करायचा,त्याला आईवडिलांचे प्रेम कोण देणार ? हा विचार करून आजीनेही आपल्या ११ महिन्याचा नातवाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला. आजी नातवाला घेऊन आत्महत्या करायलाही गेली ; मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्या आजी- नातवांना शिरटीच्या भंडारे कुटुंबियांनी आत्महत्यापासून रोखले. आणि त्या निराधारांना आधार देऊन कायमचे आपल्या घरी आणले. त्या दोघांना मायेची ऊब देऊन आपल्या कुटुंबातीलच एक घटक म्हणून त्यांना आसरा दिला. या दोघांच्या पालनपोषणाची जबाबदारी भंडारे कुटुंबियांनी घेतली आहे.
सूरज दत्तात्रय बोरकर आणि तेजल सूरज बोरकर या दांपत्याने तीन वर्षापूर्वी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्यांच्या ११ महिन्याचा ईशान नावाच्या मुलाला पोरके केले. मुलगा आणि सून गेली, आता आपण तरी जगून काय करायचे या विचाराने आजी रेखा बोरकर यांनीही ईशानला घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच शिरटीतील रामदास भंडारे यांचे कुटुंबीय त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी ईशान आणि त्याची आजी रेखा हिला घरी आणले, आणि धीर दिला. भंडारे कुटुंबीय गेल्या तीन वर्षापासून त्यांचा त्या दोघांचा सांभाळ करीत आहे. ते इशानची पोटच्या गोळ्याप्रमाणे खूप काळजी घेतात. या आजी नातवाला भंडारे कुटुंबीय कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही. नुकताच २९ जून रोजी इशानचा तिसरा साजरा वाढदिवस संपन्न झाला. भंडारे कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. अनेक मान्यवरांनी या वाढदिवसाला उपस्थिती लावली. ईशानने देखील भंडारे कुटुंबियांना मायेचा लळा लावला आहे.
दरम्यान, इशानची आजी रेखा बोरकर बोलताना म्हणाल्या की, रामदास भंडारे यांच्या कुटुंबाने आम्हाला खूप मोठा आधार दिला आहे. मी त्यांच्याच कुटुंबातील एक व्यक्ती आहे, अशी मला ते वागणूक देतात. मी आणि माझा नातू खूप आनंदी असून आम्हाला ते कोणतीही उणीव भासू देत नाहीत, असे बोरकर म्हणाल्या.
रामदास भंडारे हे शिरटी ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्यांची एकत्र कुटुंब पद्धती असून घरात १८ लोक राहतात. त्यांचे बंधू लक्ष्मण भंडारे हे शिरोळ येथे महाकाली लोणी डोसा हे सेंटर चालवतात. विविध समाजघटकातील लोकांच्या अडीअडचणीला ते मदत करतात. अशाच एकाकी पडलेल्या बोरकर कुटुंबातील आजी- नातवाला आश्रय देऊन त्यांनी खूप मोठे जनसेवेचे कार्य केले आहे.


