
कोल्हापूर :कोल्हापूरला चित्रपंढरी म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र फिल्म, कंपनी प्रभात फिल्म कंपनी, हंस पिक्चर्स, प्रभाकर चित्र अशा अनेक चित्रसंस्थांची उभारणी कोल्हापुरात झाली. अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती कोल्हापुरात होत होती. कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, चित्रपती व्ही शांताराम, मास्टर विनायक अशा अनेक दिग्गजांची परंपरा कोल्हापूरला लाभली आहे. कालौघात कोल्हापुरात चित्रपट निर्मितीचे प्रमाण कमी झाले. मुंबई आणि पुण्यामध्ये चित्रपट निर्माण होऊ लागले. कोल्हापूरच्या चित्रनगरीची अवस्था दयनीय होती. निधी अभावी अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत होते. आमदार अमल महाडिक यांनी चित्रनगरीचे रूप बदलण्याचा निर्धार केला. कोल्हापुरात काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार अमल महाडिक यांनी चित्रनगरीसाठी ५० कोटी रुपयांचा निधी आणण्याची घोषणा केली होती. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे चित्रनगरीला निधी देण्या संदर्भात पाठपुरावा केला.
आमदार महाडिक यांच्या सातत्यपूर्ण पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश आले असून कोल्हापूरच्या चित्रनगरीसाठी तब्बल ४४ कोटी ३७ लाख ९८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून चित्रनगरी परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
प्राप्त निधीपैकी २ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी चित्रनगरी परिसराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी देण्यात आला आहे. तर चित्रनगरीचे मुख्य प्रवेशद्वार उभारणे, सौर ऊर्जेद्वारे चित्रनगरी परिसराला वीज पुरवठा करण्यासाठी ३०० केव्ही क्षमतेचे सोलर पॅनल उभारणे, चित्रनगरी मधील लोकेशनचा भाग असलेल्या मंदिरासाठी घाट बांधणे तसेच जलाशयाचा विकास करणे, स्टुडिओ क्रमांक चारचे बांधकाम करणे या कामांसाठी १४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
कोल्हापूर चित्रनगरीमध्ये चित्रीकरणाबरोबरच पोस्ट प्रोडक्शनची सुविधा असावी अशी मागणी निर्मात्यांमधून बऱ्याच वर्षांपासून केली जात होती. चित्रनगरीमध्येच पोस्ट प्रोडक्शनची सुविधा झाल्यास वेळ आणि पैशाची बचत होणार आहे ही बाब ध्यानात घेऊन आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून चित्रदगरीमध्ये पोस्ट प्रोडक्शन युनिटच्या बांधकामासाठी ११ कोटी १६ लाख रुपये आणि पोस्ट प्रोडक्शन युनिट मधील अद्ययावत यंत्रसामग्री आणि अन्य सुविधांसाठी ९ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर कोल्हापूर चित्रनगरी चित्रित होणाऱ्या चित्रपटांसाठी स्क्रीनिंग थिएटर चित्रनगरी परिसरात उभारण्यात येणार आहे. या स्क्रीनिंग थिएटरच्या बांधकामासाठी ६ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
एकूण ४४ कोटी ३७ लाख ९८ हजार रुपये खर्चाच्या या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
आमदार अमल महाडिक यांनी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या भरीव निधीतून कोल्हापूर चित्रनगरी परिसराचा विकास होणार आहे. लवकरच नवनवीन चित्रपटांची निर्मिती चित्रनगरीत होऊन कोल्हापूरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांना रोजगार मिळेल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.


