मलकापूर प्रतिनिधी:
जुन्या रुढी-परंपरांना फाटा देत विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करून प्रबोधनातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न मलकापूरच्या राजाई महिला मंडळातर्फे करण्यात आला. शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने राजाई महिला मंडळाचे विशेष कौतुक करण्यात येवून या उपक्रमाला पाठबळ देण्याचे वचन देण्यात आले. मलकापूर मधील नरहर मंदिरात कार्यक्रम संपन्न झाला. पतीच्या निधनानंतर अनेक महिलांवर मोठी काैटुंबिक जबाबदारी येत असते.
विधवा म्हणून त्यांना अनेकदा विविध कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी मर्यादा लावल्या जातात. प्रथा परंपरांच्या नावाखाली विधवा महिलांना वेगळी वागणूक दिली जाते. या प्रथांना फाटा देत विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या १३० महिलांचा राजाई महिला मंडळातर्फे हळदी कुंकवाने मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आल्या. एक स्री सर्व प्रथम आपल्या कुटुंबाची शिल्पकार असते. ती एक मुलगी, एक पत्नी त्यानंतर एक माता या महत्वाच्या तीन भूमिका बजावते. त्यानंतर नात्यांच्या भूमिका आयुष्याबरोबर बदलत जातात. संस्कारातून समाज घडवणारी स्री ही आपल्या जोडीदाराला गमावल्यानंतर मात्र, एकटी पडते. स्री स्वतःच एक शक्ती पीठ आहे. एखाद्या स्रीवर जर दुर्दैवाने वैधव्य आले तर त्यामध्ये तिचा कोणता दोष? स्रीला वैधव्य आले तर तिच्याशी दुजाभावाने वागणूक दिली जाते.

तिला शुभ कार्यात दुय्यम दर्जा दिला जातो. जुन्या रुढींचा आधार देऊन दिला तिच्या कर्तृत्वाला झाकोळले जाते. या प्रथांना झुगारून तिचा सन्मान करण्यासाठी राजाही महिला मंडळातर्फे विधवा महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेतला. या हळदीकुंकू सोहळ्यात अनेक महिलांना गहिवरून आले. तर अनेकींना अश्रू अनावर झाले. एका महिलेने सांगितले की, गेली १४ वर्ष ती हा दुजाभावाचा अनुभव घेत आहे. खूप लहान वयात वैधव्य आले. त्यानंतर इतक्या वर्षानंतर असा मान सन्मान प्रथमच कुणी तरी देत आहे. या भावनेने अश्रूला वाट मोकळी करून दिली. सौ.अनुराधा हिरवे, सौ.चंद्रप्रभा पाडळकर, सौ.स्मिता वर्णे,प्रिया तांदळे ,शोभा हिरवे,अनुराधा हिरवे, विद्या तांदळे, मालती पेटकर ,सुलभा तांदळे या राजाई महिला मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने विनायक हिरवे, संतोष कुंभार, संभाजी लोहार, दयानंद पाटील आदी जण उपस्थित होते.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते


