
सेनापती कापशी, दि. १५:
पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या कामाची दखल संपूर्ण महाराष्ट्र घेतोय. कामाच्या शिदोरीवरच त्यांचे मंत्रीपद तहहयात आहे, असे गौरवोद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले. संपूर्ण आयुष्यभर ते गोरगरीब जनतेचे सेवक बनून राहिले. त्यांनी मंत्रिपदाचा बडेजाव कधीही केला नाही, असेही ते म्हणाले.
खासदार श्री. माने पुढे म्हणाले, मंत्री श्री. मुश्रीफ यांची गेल्या ३५-४० वर्षांची वाटचाल पाहता त्यांच्या वाट्याला संघर्ष भरपूर आला आहे. परंतु; यशही निश्चितच आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा उंचीपुढे जात-पात, धर्म, पक्ष -पार्टी कधीच आडवी आली नाही. तरुणांसाठी ते आयडॉल आहेत. जात-पात, धर्म या सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन केवळ माणुसकीच्या तत्त्वावर त्यांनी आयुष्य खर्ची घातले.
देशाचे नेते शरद पवारसाहेब हे आमचे दैवत होते, आहेत आणि राहतील. त्यांनी गडहिंग्लजच्या सभेत सांगितले की, ईडीची फाईल अजून मिटलेली नाही. ती टेबलवरून कपाटात ठेवलेली आहे. परंतु; मी नम्रपणे सांगू इच्छितो की, मला क्लीन चीट मिळालेली आहे. त्यांना मी त्याबद्दल माहितीही देईन. परंतु; राजकीय स्वार्थापोटी हे शुक्लकाष्ठ माझ्या आणि कुटुंबाच्या मागे लावणाऱ्याला ते मांडीवर घेऊन बसले आहेत. दरम्यान; आम्ही श्री. पवारसाहेब यांना ३० -३५ वर्षात काही ना काही गुरुदक्षिणा दिलेली आहे. परंतु; दहा वर्षे भाजपमध्ये राहून देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून कसलीही गुरुदक्षिणा न दिलेल्या गद्दाराला पाडा, असा संदेश श्री. पवारसाहेबांनी या सभेत दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे…. !
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विक्रमी आणि ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करण्यासाठी तिन्ही गट एकत्र आले आहेत. त्यामुळे विरोधी बाजूला काहीच शिल्लक राहणार नाही. त्यांची पळताभुई थोडी होईल.
उदयबाबा घोरपडे म्हणाले, महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह स्मारक तयार झाले आहे. या स्मारकावरही विरोधक टीका करीत आहेत. परंतु; प्रतिकूल परिस्थितीतूनही अनंत अडचणीतूनही श्री. मुश्रीफ या खवण्यान ते करून दाखवलं.
ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक म्हणाले, मुश्रीफ गट, मंडलिक गट, संजयबाबा घाटगे गट असे तिन्ही गट एकत्र आलो आहोत. मंत्री श्री. मुश्रीफ यांचा विजय एक लाखाहून अधिक मताधिक्याने होणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे.
उदयबाबा घोरपडे, अंबरीशसिंह घाटगे, दत्ताजीराव देसाई, विजय काळे, भागवत शेटके, प्रवीण नाईकवाडे, सौरभ नाईक यांची मनोगते झाली.


