
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. कामानिमित्त पूजा जगभरात प्रवास करत असते. आता देखील ती मुंबईबाहेरच आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने मुंबईमधून दुसऱ्या ठिकाणी जात असताना पूजाबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. इंडिगोच्याच एका कर्मचाऱ्याने पूजाला प्रवासादरम्यान चुकीची वागणूक दिली. हा सगळा घडलेला प्रकार पूजाने ट्विट करत सांगितला आहे.
इंडिगोचा कर्मचारी विपुल नकाशेने आम्हाला अगदी वाईट वागणूक दिली, या गोष्टीमुळेच मी खूप दुःखी झाले. कोणतंही कारण नसताना त्याने उद्धटपणे आणि धमकीच्या स्वरुपामध्ये आमच्याशी संवाद साधला. मी अशाप्रकारचं ट्विट कधीच करत नाही. पण आमच्याबरोबर घडलेली ही घटना खरंच खूप भयानक आहे.” पूजाने ट्विट करत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे.

पूजाचं ट्विट पाहून इंडिगो एअरलाइन्सने लगेचच अभिनेत्रीची माफी मागितली. इंडिगोने ट्विट करत म्हटलं की, “तुमच्याबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही तुमची माफी मागत आहोत. तुमची संपूर्ण माहिती आम्हाला मॅसेजच्या स्वरुपात पाठवा. लगेचच आम्ही तुमच्याशी संवाद साधू.” पूजाबरोबर घडलेला हा प्रकार फारच विचित्र होता.
पूजाने ट्विट केल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. विपुलने फक्त पूजालाच नव्हे तर इतर प्रवाशांना देखील चुकीची वागणूक दिली होती.