तसं पन्हाळगडावर आजपर्यंत बऱ्याचदा गेलो. पण आजचा पन्हाळगड काही वेगळाच अनुभवायला मिळाला. गडावर सहज फिरत फिरत सज्जाकोठी म्हणून जो पाॅईंट आहे तिथे गेलो, तर समोर हा तरुण उभा. आपल्याच धुंदीत त्याच्या त्या दुर्बीणीतून टेहळणी करत निवांत उभा. त्याची ती भली मोठी दुर्बिण बघीतली आणि मी त्याला जवळ जाऊन म्हंटलं मला यातून दाखवाल का.. “हो, तीन पाॅईंट दाखवणार १० रुपये होती” असं त्याने सांगितलं. मग ती दुर्बिण हळूवार सेट केली आणि पन्हाळगडाच्या दक्षिणेला अगदी शेवटचं टोक असणारं काली बुरुज हे टोक दाखवलं. उघड्या डोळ्यांनी जिथे काहीच दिसत नाही त्या दुरवर कितीतरी किलोमीटर वरचे ते स्पष्ट दृश्य बघून मी भारावून गेलो. त्या दुर्बिणीतून पाहतच हे का होतं?, त्या काळात इथून काय करत असंत? असं सहज विचारलं… त्यावर त्यानं पुढच्या क्षणी इतिहासातलं त्या जागेचं महत्त्व सांगितलं. नंतर साधारण आग्नेय दिशेला असणारा पावणगड दाखवला. ज्यावेळी गडावर दुसरीकडचं सैन्य हल्ला करत असत त्यावेळी पन्हाळगड समजून तिकडे हल्ला व्हावा यासाठीची ती त्या काळातली उभारणी. त्याच्याकडून हळू हळू इतिहासातील एक एक पान उलगडत चाललं होतं. नंतर साधारण 13-14 किलोमीटरवर असणारं ज्योतिबाचं मंदिर अगदी स्पष्ट दाखवलं. असं एक एक करत कित्येक ठिकाणं त्यानं अगदी उत्साहानं दाखवली.
“पन्हाळगड हा किल्ला मुळचा राजा भोज यांनी बांधला. नंतर तो विजापुरच्या सुलतानाकडे गेला आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांकडे. मी गडावरच राहतो. गडावर जी काही थोडी जुनी पुराणी घरे आहेत त्यापैकी आम्ही. बाकी बऱ्याच लोकांनी मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना गडावरच्या जमिनी विकल्या आणि गेले, पण काही लोक अजूनही राहीली. आमची गडावरची तेरावी पिढी! सुरवातीच्या काही पिढ्या सुलतानाच्या काळातल्या. पण जेवढे राजे येऊन गेले त्यात छत्रपती शिवाजी महाराजांकडून जे आम्हाला मिळालं ते दुसऱ्या कुणाकडूनच नाही”. लगेच त्यानं दुर्बिण घुमवली आणि पन्हाळगडाच्या पुर्वेकडच्या शेतजमिनी फोकस करुन मला दाखवल्या. त्यातलं त्याचं शेतही, कोणतं पिक आहे हेही अगदी स्पष्ट. महत्त्वाचं म्हणजे ही शेती दस्तुरखुद्द शिवाजी महाराजांनी त्यांना दिली आहे. तसेच शिवाजी महाराजांकडून मिळालेलं एक अधिकारपत्रही त्यांच्या घरी आहे.

माझ्यानंतर माझ्या सहकाऱ्यांनीही दुर्बिणीचा आनंद घेतला. अवघ्या दहा रुपयात तो इतिहासातलं बरंच काय काय सांगून गेला. काॅलेजनंतर ही दुर्बिण घेतली आणि गेल्या २० वर्षांपासून तो हे काम करतो. त्याच ठिकाणी करतो. कधी रात्रीचे चंद्र तारे तर कधी दिवसा दुरवरच्या झाडीतला एखादा प्राणी न्याहाळत. त्याच्या या योगदानापुढं दहा रुपये काहीच नव्हते. मी न रहावून त्याला म्हंटलं फक्त दहाच का? त्यावर त्याच उत्तर होतं, “महाराजांनी घर दिलं, शेत दिलं, गडावर जागा दिली आहे. त्याबदल्यात त्यांचा थोडाफार इतिहास जगाला सांगितला तरी धन्य झालो. उगीच महाराजांच्या नावावर धंदा करायचा नाही म्हणून फक्त दहा.
मी नाव विचारलं त्यानं सांगितलं “साजिद मुजावर”. कुणाला या म्हणणं नाही, काही नाही. मार्केटिंग नावाचा प्रकार नाही. जे लोक त्याला येऊन स्वतःहून विचारतात त्यांना त्याच्या मुड नुसार तो भरभरून सांगायला आणि दाखवायला सुरवात करतो. आपण उगाच जाती धर्माच्या भिंतींमध्ये महाराजांना आणि एकमेकाला वाटून घेतो, द्वेष करत बसतो. काही लोकं ही त्यापलिकडे असतात.
डॉ विशाल सकटे


