
गारगोटी (प्रतिनिधी) गोकुळच्या दूध उत्पादकांचा आर्थिक विकास हाच आमचा ध्यास असून मुंबईच्या बाजारपेठेत कोल्हापूरच्या म्हैस दुधाला मोठी मागणी असल्याने दूध उत्पादकांनी शेतीला जोडधंदा असणारा दूध व्यवसाय सुधारित जातींच्या म्हैशींचे संगोपन करून मुख्य व्यवसाय म्हणून करावा आणि कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले. कलनाकवाडी ता. भुदरगड येथील भोसले मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या भुदरगड तालुका दूध संस्था संपर्क मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.लंपीचा धोका भविष्यात ही राहणार असल्याचे पशुवैद्यकीय तज्ञांचे मत असून उत्पादकांनी जनावरांच्या योग्य संगोपनाबरोबरच गोकुळच्या किसान विमा पॅकेज मध्येही सहभाग घ्यावा असे आवाहनही श्री डोंगळे यांनी यावेळी केले.
स्वागतपर भाषणात गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे यांनी दूध उत्पादकांनी गोकुळच्या सेवा सुविधांचा लाभ घेऊन किफायतशीर दुग्ध व्यवसाय करावा, तालुक्यातील दूध संस्था आणि उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे सांगितले.गोकुळ तथा केडीसीसी बँकेचे संचालक रणजीतसिंह पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात बँके मार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून तालुक्यात गट- तट न पाहता म्हैस- गाय खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्याची ग्वाही दिली.या कार्यक्रमात गोकुळच्या चेअरमन पदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल अरुण डोंगळे यांचा भुदरगड तालुक्याच्या वतीने तालुका संघाचे माजी चेअरमन अशोकराव भांदिगरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच लंपी प्रादुर्भावाच्या काळात तालुक्यात प्रभावी वैद्यकीय सेवा दिलेले जि.प.चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव मेटांगळे ,गोकुळचे डॉ. पी एम पाटील ,डॉ. चव्हाण ,डॉ. बंडेलवाल ,विस्तार अधिकारी भैरवनाथ घावरे यांचेही सत्कार श्री. डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लंपी आणि इतर आजाराने मयत झालेल्या जनावरांना गोकुळच्या किसान पॅकेज अंतर्गत अर्थसहाय्यचे धनादेश देण्यात आले.या संपर्क सभेस दूध संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, शरद तुरंबेकर ,श्री कापडिया ,डॉ. मोंगले, भरत मोळे, शेखर पाटील ,अजित जगताप यांनी समर्पक उत्तरे दिली.या सभेस गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रा. किसनराव चौगले, अभिजीत तायशेटे, आर के मोरे ,अजित नरके ,अमर पाटील, अमरीश घाटगे ,बयाजी शेळके ,प्रकाश पाटील ,श्रीमती अंजना रेडेकर , डॉ.प्रकाश साळोखे, ए एन जोशी,आशिष पाटील,बापूसाहेब आरडे, प्रा. एच आर पाटील ,सुरेश नाईक, कॉ. सम्राट मोरे, बाळासाहेब भोपळे , आदी मान्यवरासह तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन एम पी पाटील यांनी केले तर आभार सहाय्यक व्यवस्थापक सुभाष जामदार यांनी मानले.


