कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर, यादवनगरमधील झोपडपट्टीधारकांना त्यांच्या वापरातील जागा मालकी हक्काने मिळावी, महानगरपालिका हद्दीतील सिटी सर्वे न झालेल्या भागात वाढीसाठी सर्वे करुन सर्व नागरिकांना प्रॉपर्टी कर उपलब्ध करुन द्यावा आणि विभागीय क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी बैठक आयोजित करावी इत्यादी मागण्यांची निवेदने माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आली आहेत.
कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर, यादवनगर परिसरातील शासकिय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकिच्या जमीनीवर आर्थिकदृष्टया दुर्बल प्रवर्गातील नागरिक गेली अनेक वर्षे कच्च्या पक्क्या स्वरुपाच्या झोपडीवजा घरामध्ये राहात आहेत. त्यापैकि अनेक झोपडपट्टीधारकांना कोल्हापूर महानगरपालिकेकडून झोपडपट्टी कार्ड देण्यात आलेले आहे. उपरोक्त झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणा-या नागरिकांकडे त्यांचाकडून वापर होत असलेल्या भूखंडाच्या मालकी हक्काबाबतचे कागदपत्र उपलब्ध नसलेने सदर ठिकाणी त्यांच्या झोपडपट्टीमधील घरांचा विकास करणे, तसेच अन्य अनुषांगिक सोई-सुविधा (गृहकर्ज तसेच बांधकाम परवाना इ.) उपलब्ध करुन घेण्याकरीता मर्यादा येत आहेत. मा. पंतप्रधान महोदय यांच्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या धोरणाची अमलबजावणी करणेसाठी विषयांकित राजेंद्रनगर तसेच यादवनगर मधील झोपडपट्टी धारकांना त्यांच्या वापरात असलेल्या जागा कायमस्वरूपी मालकी हक्काने मिळणेबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती अमल महाडिक यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

याचबरोबर कोल्हापूर शहरातील महानगरपालिका हद्दीची वाढ वारंवार झालेली आहे. परंतु त्याचबरोबर सिटी सर्वे हद्दीची वाढ झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात जवळजवळ ८० हजार मिळकतीना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही. सदर प्रॉपर्टी कार्ड नसल्याचे नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेणे, बांधकाम परवाने सुलभ पध्दतीने मिळवणे कर्ज प्रक्रिया सुलभ पध्दतीने मिळवणे तसेच अनेक शासकिय योजनांचा लाभ घेता येत नाही. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरुन, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आधीच्या ज्या भागाचा सिटीसर्वे झालेला नाही, त्याच्या वाढीसाठी मोजणी करून सर्व मिळकत धारकाना प्रॉपर्टी कार्ड मिळणे विषयी आवश्यक असलेला निधी शासनाकडून उपलब्ध होणेबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी अमल महाडिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोल्हापूर जिल्हयातील विभागीय क्रिडा संकुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून पूर्ण झालेले नाही. या क्रिडा संकुलातील कामे सध्या बंद आहेत. या विविध विकास कामाबद्दल व अद्याप प्रलंबित असणारी सर्व कामे पूर्ण होणेबाबत वेळोवेळी सर्व संबंधीताना कळवूनसुध्दा अद्याप या क्रिडा संकुलातील बरीचशी कामे अपूर्ण आहेत. तरी विभागीय क्रिडा संकुल कोल्हापूर येथील अपूर्ण व प्रलंबीत कामासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या उपस्थितीत सर्व संबंधीतासमवेत बैठक आयोजित करुन क्रिडा संकुलाचे काम पूर्ण होणेबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंती अमल महाडिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सत्यजित उर्फ नाना कदम, विजय सूर्यवंशी, विलास वासकर, आशिष ढवळे, राजसिंह शेळके, किरण नकाते, वैभव माने, विजयसिंह खाडे पाटील, रूपाराणी निकम, स्मिता माने, कविता माने इत्यादी उपस्थित होते.


