दि १६ एप्रिल २०२४
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी इंडिया आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून त्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. या शक्तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता असून कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे या शक्तीप्रदर्शनाकडे लक्ष लागून राहिले आहे. माजी खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगिता राजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यश राजे देखील यावेळी काढण्यात येणार्या रॅलीत सहभागी होणार आहेत.

ऐतिहासिक दसरा चौकातून सकाळी दहा वाजता शक्तीप्रदर्शन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. त्यासाठी मुस्लीम बोर्डिंगजवळ भव्य मंडप उभारण्यात आला आहे. जिल्ह्यातील कानाकोपर्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, डावे पक्ष, आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडीचे नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शक्तीप्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
कोल्हापूर शहरासह कोल्हापूर दक्षिण, करवीर, गगनबावडा, कागल, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा तालुक्यातील कार्यकर्ते या शक्तीप्रदर्शनासाठी रवाना होणार आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शिवसेना उपनेते व जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.


